कुडाळ प्रतिनिधी
बनावट नोटांचा वापर करून बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्याप्रकरणी संशयित सुरेंद्र उर्फ सूर्या रामचंद्र ठाकुर (४०, रा. पलूस – सांगली) याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी १४ ऑ गस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. या गुन्हयातील अन्य दोन आरोपी कुडाळ तालुक्यातील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
ही घटना २३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.५० वाजता कुडाळ शहरातील बँक ऑफ इंडिया कुडाळ शाखेच्या बाजूला असलेल्या याच बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनच्या ठिकाणी घडली होती. संशयित सुरेंद्र ठाकुर याने ३ हजार २०० रु. रकमेच्या नोटा कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरल्या होत्या. संशयिताने या नोटा
कुडाळमधीलच एका महिलेच्या खात्यात जमा केल्या. त्यानंतर या
नोटा बनावट असल्याचे बँकेच्या लक्षात आले. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेने या नोटा नाशिक येथे तपासणीसाठी पाठविल्या होत्या. तेथून या नोटा बनावट असल्याचा अहवाल प्राप्त झाला. पोलिसांनी याचा शोध घेतल्यानंतर यातील सुरेंद्र ठाकुर आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.