भारतीय जनता पार्टीचा आज ४४ वा वर्धापनदिन सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात विशाल परब यांनी साजरा केला. पक्षाच्या व संघटनेच्या निर्मितीसाठी व वाढीसाठी अनेकांनी समर्पण केले. त्यांच्या समर्पणातूनच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. त्या सर्वांना आपण विनम्रतापूर्वक वंदन करतो व भारतीय जनता पार्टीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा चिंतितो, अशा शब्दात त्यांनी भाजप वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीचा उमेदवार येत्या तीन ते चार दिवसात जाहीर होईल. महायुतीचा उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्क्याने विजयी व्हावा यासाठी तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन प्रचार करणार असून मतदारसंघातील भाजप व मित्रपक्षांची एकूणच ताकद पाहता येथील महायुतीचा उमेदवार किमान अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष हा आज केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा पुढे येणार असून भाजपचे ४०० पार चे उद्दिष्ट देखील सफल होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून दहा वर्षातील केलेली कामे, सर्वसामान्य लोकांसाठी राबविलेल्या विविध योजना व गोरगरिबांसाठी केलेले कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत नेणार आहेत. भविष्यातही या देशातील उरली-सुरली गरिबी दूर होऊन प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी आमचा पक्ष निश्चितच काम करणार आहे, असेही ते म्हणाले.