सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी
ग्रामसेवक, कार्यालयीन वेळेत येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्व ग्रामसेवकांसह सर्व गटविकास अधिकारी, खाते प्रमुख याना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. तसेच सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत मध्ये कुठलेही साहित्य खरेदी न करता खरेदी केल्याचे दाखऊन ७२ लाख ८१ हजार रूपये हड़प करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ठेकेदार याच्यावर गुन्हा दाखल आहे. तरी ग्रामपंचायत सदस्य व पर्यवेक्षणीय अधिकारी यांनाही जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी आज निरवडे येथील सौ श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी जिल्हा परिषद समोर आंदोलन सुरू केले आहे.
शासनाचे स्पष्ट निर्देश असूनही अद्यापही जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जात नाही. जिल्हा परिषद खाते प्रमुख गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी अद्यापही शासन प्रचलित नियमानुसार बायोमेट्रिकचा वापर करत नसून शासनाची फसवणूक करून वेतन घेत आहेत, तरी संबंधितांवर दोन वेतन वाढ रोखण्याची प्रशासकीय कारवाई करावी. तसेच सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत मध्ये, सन २०२१- २२, २०२२-२३ या काळात साहित्य खरेदीसाठी ७२ लाख ८१ हजार ०७० एवढी रक्कम कुठलेही साहित्य खरेदी न करता खरेदी दाखवून १४ व १५ वा वित्त आयोगातील रक्कम हडप करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे याप्रकरणी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामविकास अधिकारी व संबंधित ठेकेदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामध्ये सहभागी असलेल्या ग्रामपंचायत सदस्य व पर्यवेक्षणीय अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली नाही तरी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल
करावा
गावामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे विकासाच्या दृष्टीकोनातून शासकीय योजना अंमलबजावणीसाठी फार मोठे महत्त्वाचे पद आहे. परंतु निर्धारीत वेळेत ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी कार्यालयात हजरच राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या अनेक दिवस प्रलंबित राहतात, याचा सर्वाधिक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे सर्वसाधारण ११ वाजल्या नंतरच कार्यालयात येतात व ३ वाजल्या नंतर गायब होतात, ही ग्रामीण भागातील वस्तुस्थिती असून पर्यवेक्षणिय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत हे याबाबत कोणतेही नियंत्रण ठेवत नाहीत. याचा फायदा संबंधित ग्रामसेवक घेत असल्याचे दिसून येत आहे. गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, मुख्य कार्यकारी अधिकारी हे याबाबत नियंत्रण ठेवण्यात कमी पडत असल्याने अपहार, गैरव्यवहार या सारखी प्रकरणे वाढली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना तातडीने बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करुन अंमलबजावणी तातडीने करावी व आम नागरिकांची गैरसोय दूर करावी. या मागणीसाठी निरवडे येथील सौ श्रीमती गावडे यांनी आज पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे.