आतापर्यंत सत्ताधारी लोकांनी काही केले नाही एकमेकांवर टीका करण्यात ते व्यस्त:अर्चना घारे-परब
सावंतवाडी प्रतिनिधी
पारपोली श्री देवी पावणाईच्या कार्तिक एकादशीच्या सप्ताहाची सुरुवात करताना याठिकाणी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. श्री देवी पावणाईला वंदन करून आजची सुरूवात झाली. तुमची एक बहिण, तुमची लेक निवडणूकीच्या रिंगणात उभी आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची हे तुम्ही ठरवायचे आहे. आतापर्यंत सत्ताधारी लोकांनी काही केले नाही. एकमेकांवर टीका करण्यात ते व्यस्त आहेत असा टोला अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी लगावला. तुमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहीन. यासाठी तुमचे आशीर्वाद द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार सौ. घारे यांनी केले.
पारपोली फुलपाखरांचे गाव आहे. परंतु, ते बघायला जाणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते नसतील तर पर्यटक येतील कसे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच निवडून आल्यावर गणपती विसर्जन करण्यासाठी गणेशघाट पहिल्या सहा महिन्यांत पूर्ण करेन, ग्रामसंघाचे कार्यालय सुद्धा देईन असे आश्वासन दिले. आपल्या महिला कष्टकरी मेहनती आहेत. परंतु, त्यांच्या हाताला काम नाही. आपल्या प्रत्येक घरातील महिला ही सुखी, समाधानी झाली पाहिजे. आज या महिला भगिनी दुःखी आहेत.त्यांची मुले आज घरात नाहीत. त्यामुळे तुम्ही संधी दिल्यावर दोन महिन्यांत मोठ्या कंपन्या आणून रोजगार उपलब्ध करून देईन, नंतर मुले आपल्या गावातच राहतील. तसेच संपूर्ण राज्यात रोजगार, आरोग्याची सुविधा चांगली आहे. मात्र, आपल्याकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ती नाही आहे. त्याला कारण आतापर्यंत निवडून गेलेले नेतेमंडळी आहेत. त्यांनी लक्ष न घातल्याने ही दुरावस्था आहे. आता मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वांची पाकीट येतील. ती पाकीट तुम्ही घ्या. कारण, ते पैसे तुमचेच आहेत. माझ पण पाकीट तुमच्यापर्यंत येईल . पण यामध्ये आपल्या विकासाचा आराखडा असेल … मतदान करताना मात्र माझ्या लिफाफा म्हणजेच पाकीट या चिन्हाला करा असे आवाहन अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी केले.