राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

अ‍ॅड.सुधीर राऊळ,अ‍ॅड.कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद

मालवण प्रतिनिधी
मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटमुळे छत्रपतींचा अपमान झाल्याने माजी आमदार वैभव विजय नाईक यांनी याप्रकरणी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून त्या कार्यालयात जाऊन दांड्याने दरवाजा – खिडक्यांच्या काचा फोडून व अन्य साहित्याचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरिश्चंद्र उर्फ हरी मोहन खोबरेकर यांची कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश जी.ए.कुलकर्णी यांनी काल २१ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्दोष मुक्तता केली आहे. २६ ऑगस्ट २०२४ रोजी ही घटना घडली होती. या संशयितांच्यावतीने अ‍ॅड. सुधीर राऊळ, अ‍ॅड. कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी काम पाहिले.

मालवण राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पुर्णकृती पुतळा उभा केला होता. २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १ वा. च्या सुमारास सदर पुतळा कोसळला. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तत्कालीन आमदार वैभव नाईक, हरी खोबरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते त्या घटनेच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर ते तेथून दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मालवण – मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलक्या दर्जाचा बांधला हेच(सा.बां.विभाग) त्याका जबाबदार हत अशा भाषेत संताप व्यक्त करत वैभव नाईक यांनी सा.बां. कार्यालयात जाऊन लाकडी दांड्याने कार्यालयातील दरवाजा व खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच सदर कार्यालयातील टेबलावरील काचा व संगणकावर दांडा मारून नुकसान केले व नंतर ते तेथून निघून गेले. अशी फिर्याद मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कैलास शिवाजी ढोले यांनी मालवण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार वैभव नाईक, हरी खोबरेकर यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्तीची हानी प्रतिबंधक अधिनियम- १९८४ चे कलम ३ सह भारतीय न्याय संहीता-२०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात सदर खटला सुरू होता. संशयितांच्यावतीने अ‍ॅड.सुधीर राऊळ,अ‍ॅड. कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश जी.ए.कुलकर्णी यांनी माजी आमदार वैभव नाईक व हरी खोबरेकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page