कुणाल किनळेकरः अधिकारी पालकमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात..
कुडाळ (प्रतिनिधी)
तब्बल सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळा नंतर आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी असताना जनता दरबार घेऊन पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण नेमकं काय साध्य करणार, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे.
श्री किनळेकर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणतात, गेल्या महिन्याभरापूर्वी सासोली दोडामार्ग ग्रामस्थ यांना दिलेल्या शब्दाला जागत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारीं सारख्या जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना आपला आक्रमक अंदाज दाखवत ज्या पद्धतीने फटकारले होते. त्यावेळेस खरोखरच वाटले होते की काही स्थानिक एजंट हाताशी धरून आलेल्या धनदांडड्या परप्रांतीयांना मुजोर अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन दिलेल्या खोट्या सनदी पालकमंत्र्यांच्या आदेशाने तात्काळ रद्द होतील. परंतु तब्बल एक महिना होऊन सुद्धा अधिकारी पालकमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. असे असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवसच बाकी असताना पालकमंत्री सामान्य जनतेला या मुजोर अधिकाऱ्यांकडून कसा काय न्याय मिळवून देतील? सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित असताना जिल्ह्यात पर्यटन सुविधांचा पुर्णपणे अभाव आहे. अशात कोकण रेल्वे स्थानकांचे मनमोहक असे शुशोभीकरण अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशी-परदेशी पर्यटक जिल्ह्यात कसे येतील व थांबतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील युवकांचे रोजगाराचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे श्री. किनळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.