ख्रिस्ती बांधवांच्या मेळाव्यात भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे प्रतिपादन
सावंतवाडी प्रतिनिधी
धर्म कोणताही असो, तो प्रेम, शांती आणि संयम यांचाच संदेश देत असतो. धर्म म्हणजे तुमच्या व्यक्तिगत आणि सामाजिक संवेदनशीलतेचे मर्म असायला हवे. आमच्या सावंतवाडीतील ख्रिश्चन समाज हा अतिशय शांतीप्रिय समाज असून या समाजाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मी स्वतः देखील शांतीप्रिय असून मी कधीही कुणावर चिडत नाही किंवा कुणावर टीकादेखील करत नाही. ही मी अंगीकारलेली येशू ख्रिस्ताचीच शिकवण असून सर्वांचा आदर ठेवून समोरच्याशी संवाद साधायला मला मनापासून आवडतो, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले. सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या ख्रिस्ती बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
ख्रिस्ती समाज बांधवांच्या सुखदुःखात मी नेहमीच सहभागी असतो. भारतीय जनता पार्टी हा सबका साथ – सबका विकास आणि सबका विश्वास या ध्येय धोरणावर चालणारा पक्ष आहे. समाजाच्या प्रगतीसाठी भाजपा नेते पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून विविध योजना ख्रिश्चन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण बांधील आहोत. इथल्या सर्वात जुन्या चर्चच्या नूतनीकरणासाठी आपण प्रयत्न करत आहात, त्यात मी स्वतः मदत करेनच, त्याशिवाय माझी सहकारी मित्रमंडळी आणि सरकारी योजनेतून योग्य ते सहाय्य मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करेन, असेही यावेळी श्री विशाल परब यांनी सांगितले.
या मेळाव्याला शेकडो ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्यासह ऍड अनिल निरवडेकर माजी आरोग्य सभापती श्री सुधीर आडिवरेकर, भाजपा जिल्हा ओबीसी आघाडी सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष श्री.दिलीप भालेकर, भाजपा सावंतवाडी तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री केतन आजगांवकर, सावंतवाडी चर्चचे पॅरीशप्रीस्ट फादर मिलेट डिसोजा, फादर रॉजर डिसोजा, फादर रिचर्ड सालदाना, फादर फिलिप घोन्सावीस, सावंतवाडी कॅथोलिक असोसिएशनचे अध्यक्ष जॉय डान्टस, उपाध्यक्ष आगोस्तीन डिसोजा, सेक्रेटरी जॉनी फेराव, चर्चचे पिसीसी मेंबर्स पीटर डान्टस, ऑल्टर डिसोजा, आवेलीन फर्नांडिस, जॉनी डिसोजा, पास्कॉल डिसोजा, रुफीना डान्टस, रोजी डिसोजा, ॲलेक्स डिसोजा, सेबेटिन रोड्रिक्स तसेच २० वाड्यांचे प्रतिनिधी व कमिटी मेंबर्स मेळाव्यात सहभागी झाले होते. श्री विशाल परब यांनी या मेळाव्याला शुभेच्छा देत ख्रिश्चन समाजाच्या प्रगतीसाठी आपले सर्वतोपरी योगदान नेहमीच असेल हा विश्वास कायम असू द्या, असे आवाहन केले.