सावंतवाडी प्रतिनिधी
कोंडुरे-मळेवाड येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्राँग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशालजी परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली, ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे.
श्री. विशाल परब यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना दररोज एक तास व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आणि व्यायामाच्या दिशेने वळून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचेही श्री. परब यांनी कौतुक केले आणि पंचक्रोशीतील जनतेने नेहमीच अशा चांगल्या कामाला साथ द्यावी, असे आवाहन केले.
उद्घाटन सोहळ्याला तालुका उपाध्यक्ष श्री. शेखर गांवकर, सौ. शर्वाणी गावकर, (जिल्हा परिषद सदस्य) श्री. समीर केळकर, (तळवणे सरपंच) श्री. रामचंद्र गावडे (उपसरपंच,) श्री. दीपक नाईक (किनळे सरपंच,) श्री. अजित कवठणकर, (कवठणी सरपंच) श्री हेमंत मराठे उपसरपंच (मळेवाड) आणि व्यायामशाळेचे जमीन मालक श्री. रघुनाथ पाटकर यांसह पंचक्रोशीतील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.