अवैद्य वाळू वाहतूक प्रकरणी मालकांसह चालकांवर गुन्हा दाखल

दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली

कुडाळ प्रतिनिधी
डंपर चालवण्याचा परवाना नसताना अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या दोन चालकांसह त्या डंपरच्या मालकांवर कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डंपर मालक ऋतिक प्रदीप महाले (वय २४, रा. गोवा), सागर गजानन मुंडये (वय ३३, रा. पिंगुळी) तर चालक जॉनी लोबो (वय २१, रा. दोडामार्ग), हेरंब कुंभार (वय २३, रा. कुडाळ वरची कुंभारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून चौघांनाही २ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

सध्या महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर करडी नजर ठेवली असून अशा वाहतूक करणाऱ्या डंपरला पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे आणि या मोहिमेच्या अनुषंगाने निवती ते कुडाळ असे दोन डंपर एमआयडीसी बजाज राईस मिल समोर महसूल व पोलीस प्रशासनाने पकडले त्यामधील (जीए-०९- यू-४५७८) या आयशर डंपरमध्ये ५ लाख १५ हजार एवढ्या किंमतीची अवैद्य वाळू आढळून आली तर (एमएच ०७-६७३७) या आयशर डंपरमध्ये ४ लाख १५ हजार रुपयांची अवैद्य वाळू सापडली. हे डंपर चालविणाऱ्या चालकांकडे डंपर चालवण्याचा परवाना नसताना हे डंपर चालवत होते. यामधील डंपर चालक जॉनी लोबो व हेरंब कुंभार यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या डंपरचे मालक ऋतिक महाले व सागर मुंडये यांना ताब्यात घेतले आणि चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता चौघांनाही २ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक क- हाडकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page