कुडाळ – शिवापूर येथील कु.श्रुती शामसुंदर राऊळ ठरली फेमिना मिस इंडिया गोवा

मिस इंडिया-2024 या देशपातळीवर स्पर्धेत ७ व्या क्रमांकावर मिळविले स्थान

कणकवली प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर – गाव्हाळवाडी येथील कुमारी श्रुती शामसुंदर राऊळ ही फेमिना मिस इंडिया 2024 या स्पर्धेत फेमिना मिस इंडिया गोवा ही स्पर्धा जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर फेमिना मिस इंडिया-2024 या स्पर्धेत ती अंतिम सात मध्ये आली आहे.कु. श्रुती राऊळ हिच्या या यशा बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.आपल्या या यशात आई सौ.लता, वडील शामसुंदर व कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेली आठ वर्षे सातत्याने प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळेच येवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी करू शकले आणि फेमिना मिस इंडिया गोवा होवू शकले अशी प्रतिक्रिया कु.श्रुती हिने दिली.
२०२४ च्या मध्ये कु.श्रुती हीची गोव्यातून फेमिना मिस इंडिया गोवा साठी ३०० मॉडेल्समधून निवड झाली आणि मिस गोवा २०२४ चा मुकुट जिंकला. यानंतर ऑनलाइन ग्रुमिंग सत्रांसह तिचा मिस इंडिया २०२४ प्रवास सुरू झाला. ३० राज्यांच्या विजेत्यांसह ती एकत्र आली, जिथे ऑफलाइन ग्रुमिंग, प्रसिद्ध फोटोग्राफर्ससह फोटोशूट्स आणि कॉस्ट्यूम डिझायनर्सचे प्रशिक्षण तिच्या प्रवासाचा भाग बनले. २०२४ पर्यंत गोवा राज्यातून देशपातळीवर टॉप ७ मध्ये पोहोचलेली श्रुती राऊळ ही पहिली आहे.
कु. श्रुती राऊळ या वयाच्या १७ व्या वर्षी तिने मिस नवी मुंबई मध्ये पहिली रनरअप होण्याचा बहुमान मिळवला आणि त्याच वर्षी मुंबईतील श्रावण क्वीन स्पर्धेत देखील ती चमकली. २०२२ मध्ये तिने मिस इंडिया स्पर्धेत मुंबईत टॉप २५ मध्ये स्थान मिळवले, मात्र अंतिम निवड झाली नाही. तरीसुद्धा, हार न मानता, तिने आपल्या चुका सुधारल्या आणि मेहनत सुरूच ठेवली.अखेर ती यशस्वी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page