मुख्यमंत्री एकनाथ शिंदेः निलेश राणे यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश..
कुडाळ प्रतिनिधी
आजचा दिवस कोकणवासीयांसाठी ऐतिहासिक दिवस असून, निलेश राणे हे स्वगृही परतत आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशानेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांना कुडाळ मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, निलेश राणे यांच्या प्रवेशामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असून, या मतदार संघात लोकसभेला 26 हजार लीड मिळाले होतें तेच लीड आता 52 हजार होईल असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी आज कुडाळ येथील आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, सिंधुदुर्गात शिवसेना वाढविण्यात राणे साहेबांचा मोठा वाटा आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले. यावेळी कार्यकर्त्याला कसे जपावे त्याच्या पाठीशी कसे उभे राहावे हे राणे साहेबांकडून शिकण्यासारखे आहे. असे उद्गार काढत खासदार नारायण राणे यांचे कौतुक केले आहे.
कोकणच्या विकासाला खोडा घालणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठीच निलेश राणे हे शिवसेना शिंदे गटात आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. निलेश राणे यांचे कार्यकर्ते एकदा मैदानात उतरले तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त झाल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच्या विकास करणे हाच आमचा अजेंडा असून, सर्वसामान्य जनतेचा विकास करणे हेच आमचे ध्येय आहे.
