सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन..
वैभववाडी प्रतिनिधी
दि.११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी ११ डिसेंबर,२०२४ रोजी जागतिक पर्वत दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्हा गिर्यारोहण संघटना, विविध गिर्यारोहण संस्था, गडप्रेमी, पर्वतप्रेमी, निसर्गप्रेमी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी अशा सर्वांनी याप्रसंगी आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त पर्वत प्रेमींना सहभागी करून घ्यावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे करण्यात आले आहे.
यानिमित्ताने पर्वत पूजन, पर्वतांचे महत्त्व, त्यांची आजची स्थिती, पर्वतांचे संवर्धन, प्रभात फेरी, पोस्टर प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, निबंध स्पर्धा व तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करुन व्यापक जनजागृती करण्याबाबतचा संदेश सर्व सामान्यांपर्यंत पोहचेल अशी आशा आहे.
आपण सर्वजण मिळून हा दिवस आपापल्या पातळीवर उत्साहाने साजरा करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने केले आहे.