मालवण प्रतिनिधी
आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ले आयोजित जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत येथील सुनितादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘कविता’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ले यांनी त्रैवार्षिक चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्त जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी येथील डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश कदम यांनी ‘कविता’ नावाची कथा पाठविलेली होती. या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलन कार्यक्रमात, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. के. पाटील (प्राचार्य गोखले कॉलेज- कोल्हापूर), डॉ. माधुरी शानभाग (ज्येष्ठ साहित्यिका- बेळगाव), डॉ. आनंद बांदेकर ॲड. विलास कुवळेकर (रत्नागिरी), मंडळाच्या अध्यक्षा सौ. वृंदा कांबळी (ज्येष्ठ साहित्यिका), डॉ. ए. बी. चौगुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. नागेश कदम यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. नागेश कदम यांच्या या सुयशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य हेमंत प्रभू, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे , सर्व शिक्षकवर्ग या सर्वांनी अभिनंदन केले आहे.