अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी

सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केली मागणी..

सावंतवाडी प्रतिनिधी
तळवडे ग्रामपंचायतच्या चौदावा, पंधरावा वित्त आयोग तसेच ग्रामनिधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे याचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केली आहे.

तळवडे ग्रामपंचायतमध्ये गतवर्षी एकूण एक कोटी २० लाख एवढा अपहार झाल्याचा प्रकार श्री. जाधव यांनी उघड करत १२ डिसेंबर २०२३ रोजी त्यासंदर्भात लेखी तक्रार अर्ज जिल्हा परिषद प्रशासनाकडे करत चौकशीची मागणी केली होती. झालेल्या चौकशीनंतर तब्बल ७२ लाख ८१ हजार ७६ रुपये एवढा अपहार झाल्याचे चौकशीतून सिद्ध झाले होते, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे यांच्यासह सरपंच तसेच दोन ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये श्री. तांबे हे मुख्य संशयित आरोपी होते. मात्र गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत संबंधित संशयित यांना अटक झाली नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. तांबे यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयाकडे धाव घेत अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांने मुंबई उच्च न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाकडे श्री. तांबे यांनी आपण या प्रकरणात दोषी नसून सरपंच व गटविकास अधिकारी यामध्ये असल्याचा आरोप करत तशा प्रकारचे म्हणणे त्यांनी न्यायालयाकडे सादर केले होते. परंतु ठेकेदाराने बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचे पुरावे आम्ही न्यायालयात दिले, असे नारायण जाधव यांनी सांगितले.

सदरची माहिती न्यायालयात दिली . त्यामुळे नामदेव तांबे याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. आता सावंतवाडी पोलिसांनी संबंधितासह श्री. तांबे यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी श्री. जाधव यांनी पत्रकार परिषद केली. यावेळी माजी सरपंच कृष्णाजी उर्फ विजय रेडकर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम परब उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page