मंदार शिरसाट:शहर वासीयांने या मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग घ्यावा
कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कुडाळ शहरला सध्या प्लास्टिकच्या अनिर्बंध वापराची समस्या भेडसावत आहे. त्यामुळेच प्लास्टिक मुक्तीसाठी भव्य जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय नगर पंचायतीने घेतला आहे.
सध्या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या बाजारपेठेमुळे प्लास्टिकचा वापर बेसूमार झाला आहे. शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर प्लास्टिकचे ढीग झालेले दिसतात. यामुळे गटारे तुंबत असून जलस्रोत देखील प्रभावित झाले आहेत. भविष्यात ही समस्या आणखी उग्र रूप धारण करणार आहे.
त्याचा विचार करुन कुडाळ नगर पंचायत एक अभिनव मोहीम राबवणार आहे. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची फेरी, प्लास्टिकच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर आधारित चित्रकला, भित्तीचित्र स्पर्धा, रील स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना कापडी पिशवी वाटपाचे आवाहन करण्यात येणार आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून वापरलेल्या प्लास्टिकचे संकलन करण्यात येणार आहे. मात्र प्लास्टिक वापरावर दंडात्मक कारवाईचा कोणताही इरादा नसल्याचे आरोग्य समिती सभापती मंदार शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. शहर वासियांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि या उपक्रमाच्या संदर्भातील आपल्या संकल्पना मांडाव्यात असे आवाहन शिरसाट यांनी केले आहे.
