पोलिसांनी जनतेशी संवाद ठेवावा,ज्येष्ठ नागरिक आणि भावी पिढी सुरक्षित असावी
‘ग्रामसंवाद’ उपक्रम कौतुकास्पद
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
शिक्षणासाठी तसेच नोकरी निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर होत असल्याने ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा समाजासमोरील महत्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणीच्यावेळी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक व सुरक्षाविषयक समस्यांमध्ये त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ‘हेल्पलाईन सेवा’ अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर, पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लोककलाकार परशुराम गंगावणे, कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका श्रीमती वृंदा कांबळी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. ज्येष्ठांसाठी शासनाने अनेक कायदे तर केलेच शिवाय त्यांना विविध योजनांचा लाभ देऊन स्वावलंबी देखील बनविले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाने घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. आज सुरू केलेली हेल्पलाईन सेवा ज्येष्ठांसाठी वरदान ठरणार आहे. ज्येष्ठांनी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास त्यांना तात्काळ मदत मिळेल. त्यामुळे सर्वांनी 7036606060 हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवावा. संकटाच्या काळात आपण पोलिसांना फोन लावला तर आपल्याला निश्चितपणे मदत मिळणार हा विश्वास सिंधुदुर्ग पोलिसांवर आहे. हा विश्वास अशा उपक्रमांमुळे अधिक घट्ट होणार आहे. पोलिसांनी जनतेशी संवाद ठेवणे आवश्यक आहे. ज्यामुळे पोलिस आणि सामान्य जनता यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण होते असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, आपल्या जिल्ह्यासमोर अनेक आव्हाने आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे भावी पिढीचे भविष्य अंधकारमय बनत असल्याने हा प्रश्न सोडविणे समाजासमोर आव्हान बनला आहे. भावी पिढीला सुरक्षित ठेवणे हीच आपली गुंतवणूक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘अंमली पदार्थ मुक्त’ जिल्हा बनवायचे आहे. यामध्ये पोलिस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. मोठ्य विश्वासाने पर्यटक आपल्या जिल्ह्यात येतात. पर्यटकांना त्रास होईल असे कृत्य जिल्ह्यात होता कामा नये. काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावी. या मेळाव्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कायदेविषयक, आर्थिक गुंतवणूकीबाबत, विविध शासकीय योजना, सुरक्षितताविषयक माहिती देखील देण्यात येत असल्याने हा मेळावा कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
आमदार दिपक केसरकर म्हणाले, शासन अनेक शासकीय योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवित असते. अशा योजनांचा लाभ त्यांनी घ्यावा. ‘वयोश्री योजने’अंतर्गत ज्येष्ठांना ३ हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येत आहे. अशा अनेक योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा असेही ते म्हणाले.
