वाहून गेलेल्या त्या युवकाचा अद्याप शोध नाही

कुडाळ : तालुक्यात माणगांव खोऱ्यातील वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, या. माणगांव धरणवाडी) व सखाराम शंकर कानडे (६३, रा. माणगांव डोबेवाडी) हे दोघेही सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले. या घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्रीच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली, बचावलेल्या सखाराम कानडेची विचारपुस केली. दरम्यान मंगळवारी सकाळी एनडीआरएफ पथकासह प्रशासनाने नागरीकांच्या सहकार्याने घटनास्थळी कर्ली नदि पात्रात शोधमोहीम सुरू केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा थांगपत्ता न लागल्याने शोधमोहीम आटोपती घेतली. नदीपात्रात गाळ साठल्याने थोडा पाऊस पडला तरी पुलावर पाणी येते. आणि अशा दुर्घटना घडतात. यापूर्वी सुद्धा काहीजणांना आपले प्राण गमवावे लागल्याने या ठिकाणच्या गाळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कुडाळ तालुक्यातील माणगांव डोबेवाडी येथील सखाराम हे आपल्या कामानिमित्त वसोली सतयेवाडी येथे सोमवारी रात्री जाणार होते, त्यांना गाडी चालवता येत नसल्याने त्यांनी आपल्या नात्यातील अमित धुरी याला सोबत घेऊन सायंकाळी उशिरा ७:३० वा. च्या सुमारास माणगांव येथून वसोली सतयेवाडीकडे जाण्यासाठी निघाले; त्यावेळी पाऊस सुरू होता. त्यांची मोटरसायकल वसोली सतयेवाडी कॉजवेजवळ आली असता कॉजवेवर पाणी असल्यामुळे गाडी जाणार नाही, असे सखाराम कानडे यांनी अमित धुरी याला सांगितले मात्र पाणी कमी आहे आपली गाडी जाऊ शकते असे अमित याने सखाराम कानडे यांना सांगितले व आपल्या ताब्यातील गाडी कॉजवेवरील पाण्यातून अमितने घातली, मात्र कॉजवेवर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अमितचा गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही गाडीसह कॉजवेवरच पडले. अमितचा गाडीचा हात सुटल्याने तो कॉजवे खाली गेला. त्या पाठोपाठ सखाराम कानडे कॉजवे वरील पाण्यात पडले. सुदैवाने सखाराम कानडेच्या हाताला नदीपात्रातील झाड लागल्याने तो आधार पकडून ते काठावर आले. तर अमित वाहुन गेल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page