सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत बिघाडीचे संकेत

कामाची आश्वासने दाखवून प्रवेश, शिवसेनेकडून होणारे हे प्रयत्न महायुतीसाठी घातक ठरू शकतात

प्रभाकर सावंत:भाजपच्या स्थानिक बैठकांमध्ये कार्यकर्त्यांकडून “स्वबळाचा आग्रह”

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या
तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप भाजप सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर विजय सावंत यांनी केला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढून त्याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

श्री. सावंत यांनी आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महायुतीचा धर्म पाळत भाजपने जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांच्या विजयासाठी खूप मेहनत घेतली. मात्र, निवडून आल्यानंतर शिवसेनेचे वरिष्ठ जिल्हा पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांचा योग्य तो आदर राखत नाहीत. कुडाळ-मालवाण आणि सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वरिष्ठ पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांना वैयक्तिक प्रलोभने

सार्वजनिक कामांची आश्वासने देऊन पक्षप्रवेशासाठी उद्युक्त करत आहेत.

यापूर्वीही अनेकदा याबाबत शिवसेनेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांमार्फत सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही असे प्रकार सुरूच आहेत. पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’ स्वप्नासाठी ‘पार्लमेंट ते पंचायत तक’ आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक असताना, स्थानिक पातळीवर शिवसेनेकडून होणारे हे प्रयत्न महायुतीसाठी घातक ठरू शकतात, असे भाजपने म्हटले आहे.

जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत असून, शिवसेना ज्याप्रमाणे भाजप कार्यकर्त्यांचे प्रवेश घेत आहे, त्यापेक्षा दुप्पटीने आम्ही त्यांच्याकडील कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊ शकतो, असेही निवेदनात नमूद आहे. मात्र, युतीचा धर्म पाळण्यासाठी भाजप संयम राखत आहे. शिवसेनेच्या या धोरणामुळे भाजपच्या स्थानिक बैठकांमध्ये कार्यकर्त्यांकडून ‘स्वबळाचा’ आग्रह वाढत असून, त्यांना आवरणे कठीण होत असल्याचे श्री. सावंत यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी मा. प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पक्षप्रमुखांमार्फत योग्य त्या सूचना देण्याची विनंती भाजपने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page