कुडाळ राज्य उत्पादन शुल्कची कारवाई;गाडीसह २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त…
कुडाळ प्रतिनिधी
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने होडावडा-वेंगुर्ला येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सायमन गोसावी (वय २२) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज कुडाळ येथे करण्यात आली. त्याच्याकडून ३३ दारूचे बॉक्स आणि अल्टो कार जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सायमन हा आपल्या ताब्यातील गाडी घेऊन दारू वाहतूक करत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक मिलिंद गरुड यांनी छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत निरीक्षक मिलिंद गरुड, निरीक्षक उदय थोरात, दुय्यम निरीक्षक अर्चना वंजारी, दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, सहायक दुय्यम निरीक्षक वैभव कोळेकर, प्रसाद खटाटे, साईनाथ मेहेकर यांच्यासह संदीप कदम, विजय राऊळ आणि प्रशांत सरब यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक उदय थोरात करत आहेत.
