भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि सर्व रिक्त पदे भरली जावीत अन्यथा आंदोलन छेडणार

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

नागरिकांच्या विविध तक्रारीबाबत वैभव नाईक,सतीश सावंत यांनी जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात दिली भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयात ७० टक्के अधिकारी व कर्मचारी पदे रिक्त आहेत. ८ तालुक्यांपैकी ६ तालुक्यात तालुका भूमिअभिलेख अधिकारी नाहीत. केवळ २ तालुका भूमिअभिलेख अधिकाऱ्यांवर ८ तालुक्यांचा पदभार आहे. त्यामुळे नागरिकांची जमीन मोजणीची कामे रखडली आहेत. नागरिकांना जमिनीचे नकाशा मिळत नाहीत. महसूल विभागाचे कामकाज संगणकीकृत करण्यात आल्याचे शासन सांगत आहे मात्र त्यात अनेक त्रुटी असून नागरिकांना एकाच कामासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. एजंटांचा सुळसुळाट होत आहे.त्यामुळे भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत येत्या महिन्याभरात हे प्रश्न सुटले नाही आणि शासनाने भूमिअभिलेखच्या रिक्त पदांवर अधिकारी व कमर्चारी भरती केली नाही तर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातील कामकाजाच्या बाबतीत नागरिकांना विविध तक्रारी येत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सोमवारी ओरोस येथील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सिंधुदुर्ग कार्यालयात भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक उपस्थित नसल्याने भूमि अभिलेखचे उप अधिक्षक विठ्ठल गणेशकर व विनायक ठाकरे यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. यावेळी भूमि अभिलेख कार्यालयातील विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अतुल बंगे, बाळू पालव, सिद्धेश राणे, अमित राणे, संजय रावले आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page