स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून कारवाई करण्यात आली
कुडाळ प्रतिनिधी
येथील एका पान टपरीवर २ लाख ८८ हजारांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमरान शमसुद्दीन करोल, इम्तियाज शमसुद्दीन करोल (दोघे रा. करोलवाडी, कुडाळ), आरिफ करोल (रा. शिवाजीनगर, कुडाळ) आणि समीर पठाण (रा. हुबळी, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबतीत अधिक माहिती अशी की, अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने काल मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा आणि आशिष जामदार यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
