जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा काही व्यावसायिकांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सीताराम गावडे यांच्या पाठीशी

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व उपाध्यक्ष समिल जळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदनाद्वारे कायदेशीर कारवाईची केली मागणी

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
जेष्ठ पत्रकार व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्यूजचे संपादक सीताराम गावडे हे गेली अनेक वर्षे समाजातील विविध अपप्रवृत्ती, अवैध धंदे, अमली पदार्थ, गोवा बनावटी दारू तसेच इतर अवैध व्यापार याविरोधात सातत्याने निर्भीड आवाज उठवत आले आहेत. त्यांच्या पत्रकारितेमुळे जिल्ह्यातील सामान्य जनतेमध्ये जागृती झाली असून अनेक गैरप्रकार उघड झाले आहेत. मात्र, या सत्यवादी व निर्भीड पत्रकारितेमुळे काही व्यावसायिकांना त्रास होत असल्याने त्यांनी एकत्र येऊन सीताराम गावडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर एका व्यावसायिकाने गावडे यांना फोन करून “तुम्ही हप्ते घेतात, हप्त्यासाठी बातम्या छापता” असे असत्य आरोप करून त्यांची केवळ बदनामी केली नाही तर त्या संवादाची क्लिप मुद्दाम व्हायरल करून समाजात त्यांची प्रतिमा डागाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

हा प्रकार पत्रकारांचा आवाज दाबण्याचा, धमकावण्याचा आणि लोकशाहीतील चौथ्या स्तंभावर हल्ला करण्याचा गंभीर प्रयत्न आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करीत जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना निवेदन देऊन पुढीलप्रमाणे कायदेशीर मागणी केली आहे.
१) जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांना जीवित व सुरक्षिततेचा धोका असल्याने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे.

२) चिवला बीचवरील होमस्टे मालकाने केलेल्या बदनामीकारक फोन कॉल व व्हायरल क्लिपचा स्वतंत्र तपास करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा.

३) चिवला बीचसह जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सर्व होमस्टे व व्यवसायांची शासन मान्यता, परवानगी व कायदेशीर कागदपत्रे तपासावीत.

४) परवानगी नसलेल्या व नियमबाह्य सुरू असलेल्या होमस्टे व्यवसायांवर तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत.

५) पत्रकारांना बदनाम करून त्यांच्या लेखणीला गप्प बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

तसेच लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.सत्याला गप्प बसविण्याचा प्रयत्न हा लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे या प्रकरणात तातडीने आणि कठोर कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आब खवणेकर व उपाध्यक्ष समिल जळवी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page