जनसेवेतून मिळणारा आनंद म्हणजेच खरा ‘दया

दयानंद कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना अंतःकरणात जपणारे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवस हा केवळ केक, गिफ्ट किंवा साजरेपणापुरता मर्यादित न ठेवता, समाजाच्या गरजा ओळखून सेवेचे व्रत घेत साजरा करण्यात आला.

या निमित्ताने ६७ युवकांनी रक्तदान केले, शेकडो रस्त्यावरील मुलांना अन्नदान करण्यात आले, तर ७५ दृष्टिहीन बांधवांना सफेद काठी वाटप करण्यात आली. याशिवाय पूरग्रस्त भागातील १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट, दोन शाळांना व्हाईट बोर्ड, तसेच २१ महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात आली. या उपक्रमांमुळे समाजातील अनेक घटकांना स्वाभिमानाने उभे राहण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमात स्वयंरोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमात कोकण संस्थाचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत, प्रकल्प समन्वयक हनुमंत गवस, प्रकल्प व्यवस्थापक अमित पाटील, लेखापाल अवंती गवस, तसेच अमोल गुराम आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. दयानंद कुबल यांनी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळात सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत असून ग्रामीण विकास, अनाथ मुलांची काळजी, शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, स्वच्छता आदी क्षेत्रांत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

“दया ही केवळ नावात नसून कृतीतून ते समाजाला आनंद देण्याचे कार्य करतात,” असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करत राहण्याची प्रेरणा दयानंद कुबल यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेकांना मिळत आहे.
त्यांच्या जनसेवेतील ‘दया’ खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page