मुंबई प्रतिनिधी
राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर झाला असून, यामध्ये २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आज, ४ नोव्हेंबरपासून, या भागांमध्ये आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, मतमोजणी आणि निकाल ३ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होईल.
राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगर पंचायती, ३३६ पंचायत समिती आणि २४६ नगरपालिकांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.
* निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक*
या निवडणुकांसाठी आयोगाने खालीलप्रमाणे तपशीलवार वेळापत्रक (टाईमटेबल) जाहीर केले आहे:
नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्यास सुरुवातः १० नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदतः १७ नोव्हेंबर २०२५
अर्जाची छाननीः १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीखः २१ नोव्हेंबर २०२५
निवडणूक चिन्हांचे वाटपः २६ नोव्हेंबर २०२५
मतदानः २ डिसेंबर २०२५
निकालः ३ डिसेंबर २०२५
मतदार संख्या आणि तयारी
या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीनुसार, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी राज्यात एकूण १३ हजार कन्ट्रोल युनिट (Control Units) स्थापन करण्यात आले आहेत.
