कामळेवीर शाळेत ‘इतिहासाची साधने’ या विषयावर विद्यार्थ्यांना दिला आगळावेगळा अनुभव

सावंतवाडी प्रतिनिधी
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कामळेवीर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाची साधने” या विषयावर शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील विविध साधनांची ओळख करून दिली. त्यांनी मोडी पत्रे, ताम्रपत्र, वीरगळ तसेच गड–कोट–दुर्ग यांचे छायाचित्र दाखवून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावले.

यावेळी वाघनखे, ढाल, बिचवा, कट्यार, कुऱ्हाड, मराठा गुर्ज, दांडपट्टा, नागिन तरवार, मराठा धोप, राजपुत तरवार, जिरेटोप यांसारखी दुर्मीळ ऐतिहासिक शस्त्रे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून ती हाताळण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी इतिहासाशी प्रत्यक्ष साक्षात्कार साधत अनोखा अनुभव घेतला.

ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ग्रंथांची ओळख, वाचनाचे महत्त्व तसेच ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे भान याबाबत मार्गदर्शन केले. दोन्ही संस्थांकडून होत असलेल्या संवर्धन कार्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या उपक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाधर रेडकर, शिक्षणतज्ज्ञ घनश्याम आळवे, ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधर गोवेकर, तसेच यशवंत वराडकर, विजय वराडकर, रुपेश चांदरकर, मुख्याध्यापक विजय कदम, पदवीधर शिक्षिका अनघा निरवडेकर, उपशिक्षक विलास गोठोस्कर, भालचंद्र आजगांवकर, रुचिता राऊळ, पालक, ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक यांनी ज्ञानेश्वर राणे यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. विद्यार्थ्यांना इतिहासाशी जोडणारा आणि प्रेरणादायी असा हा उपक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page