शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद, युवक-महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभाग..
सावंतवाडी प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत कविटकर यांच्या प्रचाराला शहरवासियांचा सकारात्मक आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. सावंतवाडीतील विविध प्रभागांत डोअर टू डोअर त्यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. घराघरातील भेटी, वैयक्तिक संवाद, महिला-युवकांचा सक्रिय सहभाग, तसेच शिवसैनिकांची जोरदार उपस्थिती या सर्वांच्या पार्श्वभूमीवर निता सावंत-कविटकर यांनी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, आज सकाळी शहरात झालेल्या प्रचारमोहीमेत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सकाळपासूनच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवासैनिक आणि स्थानिक नागरिकांनी विविध प्रभागात कॅनव्हासिंग करत पक्षाच्या नगरसेवक उमेदवारांसहित नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मोठ्या उत्साहाने साथ दिली.
प्रचारादरम्यान मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास, शहरातील विकास कारभाराचा निता सावंत-कविटकर यांचा सखोल अभ्यास, लोकांशी राखलेला संवाद, प्रत्येक नागरिकांशी केलेला थेट संपर्क या सर्व बाबींमुळे त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण सातत्याने वाढताना दिसत आहे. विशेषतः महिलांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षणीय असून, युवावर्गही या प्रचारात मोठ्या जोमाने सहभागी होत आहे.
शहरातील महत्त्वाच्या भागांत झालेल्या पदयात्रा, छोट्या सभा, तसेच कॉर्नर मिटिंग्जमध्ये निता सावंत-कविटकर यांनी आपल्या Vision-Document विषयी नागरिकांना माहिती देत, विकास हा मुख्य अजेंडा राहील, याची खात्री दिली. शहरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यटनवाढ, वाहतूक नियोजन, तसेच महिलांसाठी आणि युवकांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याच्या आश्वासनांचा प्रत्यय नागरिकांना प्रचारातून मिळत आहे.
