ना गुलाल उधळला,ना विजयाचा उन्माद,ना रॅली ना डीवचनाऱ्या घोषणा.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात अतिशय हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या मालवण व कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी बाजी मारत आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी केले, या अभूतपूर्व विजयानंतर स्वाभाविकपणे आमदार निलेश राणे हे मोठ्या जल्लोषात रॅली वगैरे काढून विजयोत्सव करतील अशी कार्यकर्त्यांसहित अनेकांची अपेक्षा होती मात्र आमदार निलेश राणे यांनी जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात येऊनही पत्रकारांशी शांतपणे संवाद साधत यावेळी आमच्या एकदा डोळ्यास हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू असल्याची प्रतिक्रिया दिली.
यावेळी विजयाचा गुलाल लावण्यासही नकार देत आमच्याच जवळच्या कार्यकर्त्यांचा कणकवलीत पराभव झाला, हे आपल्यासाठी अतिषक दुःखद असल्याचे सांगितल्या नंतर आमदार निलेश राणे त्यांच्यात असलेला संवेदनशील हळवा राजकारणी सर्वांना दिसला, कणकवली नगरपंचायतीच्या ऐतिहासिक निकालानंतरही आमदार निलेश राणे हे कणकवली शहरातून निघालेल्या रॅलीत सहभागी झाले नाहीत.
एकट्याने लढून मिळलेल्या विजयाने हुरळून जाऊन विजयाचा उन्माद करत आव्हानाची भाषा करणारे अनेक राजकारणी आजच्या दिवशी राज्यभरात दिसले मात्र कणकवलीत भाजपा उमेदवाराचा झालेला पराभव व एकंदरीतच स्वकियांशी नाईलाजाने द्यावा लागलेला लढा यामुळे दैदिप्यमान विजय मिळवूनही अतिशय शांतपणे विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत व पराभूत झालेल्या उमेदवारांच्याप्रती संवेदना व्यक्त करत आमदार निलेश राणे यांनी सर्वांची मन जिंकली आहेत.
