जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कणकवली ता.०३:-
नाटळ ग्रा. पं. च्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये राडा झाला. यात एक गटाचे 4 व्यक्ती तर दुसऱ्या गटाचे 3 व्यक्ती जखमी झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नाटळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये काही कारणांवरून शब्दीक वादंग होऊन त्याचे रुपांतर राड्यात झाले. दोन्ही गटाच्या सदस्यांनी एकमेकांवर खुर्चा फेकून मारल्या तर काही जणांनी धक्काबुक्की केली. या राड्यात एक गटाचे 4 तर दुसऱ्या गटाचे 3 सदस्य जखमी झाले. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या राड्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह शिवसैनिक तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत यांच्यासह कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. या राड्याची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत जखमींकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक समशेर तडवी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या राड्यानंतर दोन्ही गटाच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान, या राड्याला यापूर्वी झालेल्या वादाची किनार असल्याचे समजते.