एसटी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ थकबाकीबाबत आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात उठविला आवाज

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वेळेत वेतन मिळावे वार्षिक वेतन वाढीचा वाढीव दर व थकबाकी मिळावी या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनात आज तारांकित प्रश्न मांडण्यात आला. त्यावर आमदार वैभव नाईक यांनी बोलताना राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाहीत याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एसटी कर्मचाऱ्यांचे ५७ महिन्यांच्या घरभाडे भत्ता देयकाची थकबाकी शिल्लक आहे. घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतन वाढीची थकबाकी एसटी कामगारांना मिळालेली नाही. कामगार करारापोटी जाहीर केलेल्या ४८४९ कोटी रुपयांचे पूर्ण वाटप झालेले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मंत्री महोदय न्याय देतील काय? आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यभर एसटी कर्मचारी आंदोलन छेडणार आहेत ते स्थगित करणार का? अशी विचारणा आमदार वैभव नाईक यांनी सरकारकडे केली.
त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले,एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील मार्गक्रमण केले जाईल. त्याचबरोबर भत्त्यांच्या संदर्भांत कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page