सावंतवाडी उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आवाहन केले
सावंतवाडी प्रतिनिधी
मंत्री दिपक केसरकर यांना त्यांच्याच मित्र पक्षातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सणसणीत चपराक दिली आहे. त्यामुळे थापा मारणाऱ्या केसरकर यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. असे आवाहन उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केसरकर यांना केले आहे.
केसरकर यांच्या थापेबाजीवर जनतेत नाराजी आहे. आता तर केसरकर यांना त्यांच्या मित्र पक्षातील भाजपचे राजन तेली यांनीच मंत्री पदावरुन पायउतार व्हावे असे जाहीर म्हटले आहे. त्यामुळे केसरकर यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे राऊळ यांनी सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचा फटका सावंतवाडी तालुक्यासह बांदा परिसर व बाजारपेठ व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र प्रशासनाची यंत्रणा याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास कुचकामी ठरली आहे. काल व यापूर्वी झालेल्या पावसात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी केसरकर यांनी हे करु, ते करु असे सांगून अनेक आश्वासने जनतेला दिली होती. मात्र त्यापैकी एकही आश्वासन केसरकर यांनी आज पर्यंत पूर्ण केले नाही. केसरकर आता मुंबईचे निवासी झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या अडीअडचणीला आमदार धाऊन जात नाहीत अशा लोकांच्या तक्रारी आहेत. असे राऊळ म्हणाले.
आतापर्यंत विकासाच्या अनेक घोषणा करणाऱ्या केसरकर यांनी बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले. स्वतः शिक्षणमंत्री असताना ही डीएड, बीएड तरुणांना ते न्याय देऊ शकले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीडशेहून अधिक शाळा नादुरुस्त आहेत. छप्पराला गळती असलेल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसविले जात आहे, हे शिक्षणमंत्र्यांना भूषणावह आहे का ? असा सवाल राऊळ यांनी केला.