मोहन लाड:रस्त्याबाबत तात्काळ कारवाई व्हावी
कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायत माणगाव अंतर्गत येणाऱ्या
देना बँक ते जुनी शाळा नं. १ या मंजुर रस्त्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेली कित्येक वर्ष होत आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थ मोहन लाड यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माणगांव शिवापूर मुख्य रस्ता ते माणगाव कट्टावाडी हा रस्ता सन १९६१ पासून माणगाव ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. हा रस्ता ग्रामपंचायत नमुना नं. २३ नुसार १२ फुट रूंद व ६ फर्लांग लांब आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी त्यावेळी ३९६ रूपये खर्च केल्याची अभिलेखात नोंद आहे. मात्र काही लोकांनी या रस्त्यावर अतिक्रमण करून १२ फुट रुंद रस्त्याची प्रत्यक्षात २ फुट रूंदीची पायवाट केली आहे. या रस्त्याच्या मागे २० कुटुंबांची घरे असल्याने एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास, अपघात झाल्यास, गरोदर महिला व वृध्द व्यक्तींना नेण्यास रस्ता नसल्याने रहदारी करताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात लोकसभा निवडणुकीवर या वाडीतील आम्ही ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचे निवेदन प्रशासनाला दिले होते. त्या अनुषंगाने कुडाळ गटविकास अधिकारी यांनी हा रस्ता खुला करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार आम्ही लोकसभा निवडणुकीत मतदानाचा बहिष्कार मागे
घेतला. परंतु निवडणुकीनंतर रस्ता खुला करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे १५ ऑगस्टला ग्रामस्थ बेमुदत उपोषण करणार आहोत. या निवेदनावर ७८ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.