कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी रजेवर जाऊन आठवडा कालावधी संपला,मात्र प्रभारी कार्यभाराचा पत्ता नाही:प्रसाद गावडे
“आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय” असा जिल्हा परिषदेचा कारभार नुसत्या जनता दरबाराने सुधारणार का?
सिंधुदुर्ग प्रतिनिधी
शिक्षक समुपदेशन प्रक्रियेतील साशंकता,ग्रामसेवक अधिकारी पदोन्नत्यांनंतर पदस्थापनेतील अनियमितता या प्रकरणांमधून जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.तर लाड पागे भरती घोटाळा,वॉटर प्युरीफायर व देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग घोटाळा,संगणक खरेदी घोटाळा अशा प्रकरणांमधून कोट्यवधी रुपये शासन निधीचा अपहार होऊन अपहार करणारे अधिकारी व कर्मचारी आज रोजी सुशेगात फिरताना दिसतात ; मग अशा जनता दरबारातून शासनाचे कोट्यावधी रुपये लुबाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल निमित्ताने उपस्थित होत आहे. मागील आठ दिवसांपासून कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रजेवर गेल्याने त्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे अद्याप सोपविला न।गेल्याने पंचायत समितीचे प्रशासकीय कामकाज ठप्प तर झालेच आहे; याशिवाय सर्वसामान्य जनतेसाठीच्या कल्याणकारी योजनांविषयीची कामे देखील खोळंबली आहेत.ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्राबाबत आडमुठी भूमिका घेत शासन निर्णय पटलावर असताना प्रमाणपत्र देण्यास जाहिरपणे नकार देतात आणि जिल्हा परिषद प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते ही बाब निषेधार्ह आहे. ह्यातून जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील जनतेशी किंवा त्यांच्या खोळंबलेल्या कामांशी काहीही सोयरसुतक राहिले नसल्याचे ह्यातून सिद्ध होत असताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अशा भोंगळ कारभाराकडे पालकमंत्री उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार आहेत की नुसती जनता दरबाराची नौटंकी करून निवडणूक फंडे चालविणार आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांनी उपस्थित करत जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. पालकमंत्री ह्याकडे गांभीर्यपूर्वक पाहून ठोस भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.