कुडाळ प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा फोरम इंडिया च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि पांग्रड येथील शाळा क्रमांक २ मध्ये कॅरम, बुद्धिबळ, दोरी उडी मारणे आणि इतर खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अॅड. यशवर्धन राणे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगत, त्यांच्या जीवनातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी खेळ हा कसा प्रभावी मार्ग आहे, यावर भाष्य केले.
अॅड. यशवर्धन राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “देशाच्या विकासात येणाऱ्या पिढीचा उत्साह आणि आत्मविश्वास महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. खेळ हे विद्यार्थ्यांमध्ये हा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक उत्तम साधन आहे. आजच्या विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत, आणि त्यांच्यातील या गुणांचा विकास करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात पांग्रड ग्रामपंचायतीचे सदस्य प्रविण मर्गज यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाला युवा फोरम इंडिया चे सदस्य रोहन कर्मळकर, भूषण गावडे, भूषण मेस्त्री, सर्वेश पावसकर, शुभम सिंगिकर, सौरभ शिर्साट, रोहित आतक, अनुप जाधव, आणि शुभम वेंगुर्लेकर उपस्थित होते. त्यांनी देखील या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
युवा फोरम इंडिया* च्या या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, खेळाच्या माध्यमातून त्यांच्यात आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल.