भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप…
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)
खा विनायक राऊत यांचा मायनिंग आणि रेडी पोर्ट याच्याशी थेट संबंध असल्याचा आरोप करीत भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी रेडी पोर्ट येथे रेडी पोर्ट अधिकारी आणि त्यांचा मुलगा गितेश तसेच भाचा शैलेश परब यांनी काढलेला फोटोच पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत सादर केला. तसेच लांजा जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराचे पुरावे देवून खा राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून याबाबत त्यांना लवकरच नोटीस आणि समन्स बजावला जाईल, असेही सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेवून हे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी राणे यांनी खा राऊत यांनी लांजा तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेच्या ठेकेदार कंपनीच्या मालकाकडून सव्वा तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्याचे आपण पुरावे देवून त्यांच्या विरोधात चौकशी यंत्रणेकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले. मागील पत्रकार परिषदेत राणे यांनी खा राऊत यांचे मायनिंग आणि रेडी पोर्ट मध्ये सबंध असल्याचे सांगत काही दिवसांत त्याचे पुरावे सादर करू असे सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी प्रेस घेत याचे पुरावे सादर केले. रेडी पोर्टचे काम घेतलेल्या कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एम एन पाल यांच्या सोबत खा राऊत यांचे भाचे शैलेश परब, मुलगा गितेश, हिमांश परब तसेच मायनिंग व्यावसायिक विजय नाईक यांचा मुलगा सिद्धेश नाईक यांचा एकत्रित फोटो असलेला फोटो निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सादर केला. यात खा राऊत यांच्या मुलाने तोंडाला मास्क लावले असून हा फोटो ठाकरे सरकार अस्तित्वात असताना कोरोना काळात काढलेला असल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी खा राऊत यांना यावरून टार्गेट करीत खासदारकीची दहा वर्षे त्यांनी आपले कुटुंब आणि नातेवाईक यांना मायनिंग आणि त्या सबंधित क्षेत्रात ठेका मिळवून देण्यासाठी घालविली असल्याचा सुद्धा आरोप केला.