बांदा प्रतिनिधी
मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत नाडकर्णी यांच्या कायम ठेव देणगीतून त्यांचे वडील (कै.) शांताराम कमळाजी नाडकणी व आई (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.
नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे हे वीसावे वर्ष आहे. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इयत्ता पाचवी ते सातवी या प्राथमिक गटातून दोन स्पर्धक व इयत्ता आठवी ते दहावी या माध्यमिक गटातून दोन स्पर्धक सहभागी होऊ शकतात. प्राथमिक गटासाठी ‘भारतीय सण व संस्कृती’, ‘माझा आवडता संशोधक डॉ. होमी भाभा’ असे विषय असून वेळ चार मिनिटे ठेवण्यात आली आहे. माध्यमिक गटासाठी ‘साहित्यिक जयवंत दळवी’, ‘थोर उद्योजक – रतन टाटा’ हे विषय असून वेळ पाच मिनिटे ठेवण्यात आली आहे. स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करावयाचे आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धक शाळांनी आपले अर्ज मंगळवार दिनांक ३ डिसेंबर पूर्वी ग्रंथपाल, नट वाचनालय, बांदा यांचेकडे पाठवावेत. स्पर्धेत आपल्या शाळेचे स्पर्धक पाठवून सदर स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या ९४०५५७०३४९ क्रमांकावर संपर्क साधावा.