माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के यशस्वीपणे पार पाडणार:मंत्री नितेश राणे

माझ्या पदाचा जनतेच्या हितासाठी प्रामाणिक उपयोग करणार

नागपूर प्रतिनिधी
देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्या सारख्या हिंदू तरूणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या मध्यमनातून प्रयत्न करेन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार. त्या दृष्टिकोनातून माझी पाऊले टाकली जातील, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून सर्वच मंत्रिमंडळ नागपूर येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांनी मंत्री नितेश राणे यांच्यावशी संवाद साधला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत तसेच विरोधकांवर खोचक टीका केली आहे. तसेच माझ्या पदाचा लोकांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले आहे.
विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत असून यावर प्रश्न विचारला असता त्यावर नितेश राणे म्हणाले, हेच आंदोलन जर लोकसभेच्या नंतर केले असते तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता. वायनाडच्या कुठल्यातरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएम बद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता. आता लोकांनाही माहीत आहे की हे हिंदूद्वेषाचे राजकारण आहे. जेव्हा व्होट जिहाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटले नाही. तेव्हा हिरवा गुलाल उडवला. आता हिंदू समाजाने एकत्रित येऊन, हिंदुत्व विचाराचे सरकार निवडले, हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली, तेव्हा या लोकांना मिरच्या लागत आहेत. हिरव्या मिरच्या लागत आहेत. म्हणून ईव्हीएमच्या आंदोलनाला काही अर्थ नाही, असे नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत यांच्याकडून काही शुभेच्छा आल्या आहेत का, असा प्रश्न नितेश राणे यांना विचारण्यात आला तेव्हा राणे म्हणाले, महाराष्ट्रात तसेच सगळीकडूनच शुभेच्छा मिळत आहेत. संजय राऊत यांचे तेवढे मोठे मन नाही. त्याचे नाही आणि त्याच्या मालकाचे देखील एवढे मोठे मन नसल्याची खोचक टीका राणे यांनी यावेळी राऊत तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही केली आहे. अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत, केवळ त्यांनी महाराष्ट्रात नीट वागावे, व्यवस्थित तोंड उघडावे, असा सल्ला नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page