सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न..

सावंतवाडी प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य संमेलन सावंतवाडी येथे
दिमाखात संपन्न झाले. या संमेलनात सर्वात प्रभावी ठरले ते कोकणरत्न व महान लेखक जयवंत दळवी यांच्यावरील परिसंवाद. अतिशय दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा परिसंवाद ठरला. यात सहभागी झाले होते कोमसापचे ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, कोमसापचे ज्येष्ठ मार्गदर्शक व सेवानिवृत्त प्राचार्य अॅड. प्रा. अरुण पणदूरकर आणि जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी तर परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होत्या ज्येष्ठ साहित्यिका व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उषा परब.

यावेळी परिसंवादात मनोगत व्यक्त करताना अॅड. नकुल पार्सेकर यांनी जयवंत दळवी यांच्या एकूण लेखन शैलीचा अवघ्या सहा मिनिटात आढावा घेत जयवंत दळवी यांच्या ‘ठणठणपाळ’ आणि त्यांची सर्वात गाजलेली साहित्य कृती ‘सारे प्रवासी घडीचे’ यांचा विशेष उल्लेख करीत जयवंत दळवी यांचा साधेपणा, विनोदी शैली आणि कुटुंब वत्सलता या गुणांचा परिचय करून दिला.

त्यानंतर अॅड. अरुण पणदूरकर यांनी जयवंत दळवी यांच्या विविध नाट्यकृतींचा ओहापोह केला. श्री. दळवी यांच्या नाटकांमधून जयवंत दळवी यांच्या लेखन शैली विशेषतः बॅरिस्टर, दुर्गी या कादंबरीचा उल्लेख करीत विविध स्त्री पात्रे किती प्रभावी मांडली गेली, हे विशद केले.

सचिन दळवी यांनी उलगडले अनेक पैलू –

जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी यांनी लेखक जय दळवी यांचा कुटुंबातील वावर आणि त्यांच्याशी आलेले
कौटुंबिक स्नेहसंबंध यांचा उल्लेख करताना विविध महान साहित्यिक आणि जयवंत दळवी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा आपल्या मनोगतातून केला. दरम्यान ‘दळवी यांच्या विहिरीवर अनेक साहित्यिक यांनी आंघोळ केली, त्यानंतर त्यांच्या साहित्य कृती बहरत गेल्या’, हे सांगत असताना अनेक संदर्भ सचिन दळवी यांनी दिले. सचिन दळवी यांच्या मनोगतातून आजपर्यंत न समजलेले जयवंत दळवी प्रेक्षकांना समजण्यास मदत झाली.

वृंदा कांबळी यांनी केले अंतर्मुख –

परिसंवादात मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांनी जयवंत दळवी यांच्या संवेदनशीलतेच्या बाबतीत भाष्य केले. अगदी बाजारात फेरफटका मारत असताना त्यांना भेटलेली माणसे आणि त्यानंतर त्यांनी संवेदनशीलपणे त्या माणसांशी जपलेले ‘चिरंतन नाते’ हे सांगत असताना अत्यंत भावस्पर्शी कथन केले. वृंदा कांबळे यांच्या मनोगतात जयवंत दळवी हे आजच्या काळात हरवत असलेल्या माणुसकीला कसे नवसंजीवनी देणारे ठरतील, हे सांगितले. यावेळी वृंदा कांबळी यांच्या मनोगतामुळे अनेकांचे डोळे आपसूकचं पाणावले होते.

शेवटी या परिसंवादाच्या अध्यक्षा उषा परब यांनी सहभागी सर्व मान्यवरांच्या मनोगताचा आढावा घेत जयवंत दळवी किती सिद्धहस्त लेखक होते, हे विशद केले. तसेच जयवंत दळवी यांच्या विविध कथा, कादंबऱ्या व नाटकांचा संदर्भ देत त्यांच्या साहित्य संपदेचा आढावा घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन करून प्रा. रुपेश पाटील यांनी समय सूचकता बाळगत प्रेक्षकांनाही मनसोक्त हसवले तसेच सहभागी सर्व मान्यवरांच्या मनोगतला आपल्या अनोख्या निवेदन शैलीने मानवंदना देखील दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page