भंडारी समाजाचे भवन एक वर्षात पूर्ण करू.योग्य ती जागा दाखवा त्या जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला असेल

विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्त्वाचे आहे तरुण-तरुणी या जिल्ह्याचे असेट आहेत:मंत्री नितेश राणे

कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी भवन उभारण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. तुम्ही मला योग्य ती जागा दाखवा. तुम्ही घरी जायच्या आत त्या जागेचा प्रस्ताव मंजूर झालेला असेल आणि एका वर्षात भंडारी भवन त्या जागेवर निश्चितपणे उभे राहील असा विश्वास राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भंडारी बांधवाना दिला. कुडाळ येथील भंडारी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.

कुडाळ तालुका भंडारी मंडळ आयोजित भंडारी समाज मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी येथील सिद्धिविनायक हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री नितेश राणे होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, कुडाळ तालुकाध्यक्ष अतुल बंगे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष मामा माडये, माजी युवा जिल्हाध्यक्ष श्री. रूपेश पावसकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. समिल जळवी, माजी तालुकाध्यक्ष श्री गजानन वेंगुर्लेकर, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष राजू गवंडे, श्री राजन कोरगावकर, श्री मंगेश बांदेकर, श्री विजय कांबळी, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजू किर, शिवछत्रपतींचे आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे वंशज पांडूरंग मायनाक, शलाका पांजरी,
सचिव शरद पावसकर, प्रियदर्शन कुडव, श्री. चिपकर, श्री. सळस्कर सर, एकनाथ टेमकर, रमेश हरमलकर, बाबू हरमलकर, राजू जळवी, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, भंडारी निवेदक बादल चौधरी, नागेश नेमळेकर आदींसह समाजबांधव व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, अतुल बंगे आणि आपली ओळख व मैत्री जुनी आहे. आमची मैत्री राजकारणापलिकडची आहे. ते त्यांच्या पक्षाचे काम करतात, मी माझे काम करतो. पण आम्ही आमच्यातील मैत्री जोपासली आहे. हेच सर्वांनी केले पाहीजे. माझा या जिल्ह्यात कोणीही शत्रू नाही. निवडणुकीत विरोधक माझ्यावर टिका करतात, ते त्यांना करावच लागत. आम्हीही आमच्या पद्धतीने काम करीत असतो. पण जिल्ह्याचा विकास हा एकत्र येऊनच झाला पाहीजे. आज बंगे यांचा आमच्या सोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा जिल्ह्याला आणि भंडारी समाजाला होईल, याचा आपल्याला आनंदच आहे. म्हणूनच केवळ व्हॉटसअप वरील निमंत्रणाने या कार्यक्रमाला आलो आहे.

माझ्यासाठी इथला प्रत्येक विद्यार्थ्याचे भवितव्य महत्त्वाचे आहे. येथील तरुण तरूणी या जिल्ह्याचे असेट आहेत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे आपले कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्याचा प्रवास करताना समाजातील थोरा मोठ्यांचा आदर्श
घ्यावा. त्यांचे विचार आत्मसात करून, प्रेरणा घेऊन यशस्वी जीवनाकडे वाटचाल करावी. त्या त्या क्षेत्रात पुढे जाऊन, यशस्वी झाल्यानंतर पुन्हा तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची संधी समाजासह आम्हाला द्या, असे आवाहन ना. राणे यांनी केले.

पालकमंतरी नितेश राणे पुढे म्हणाले, भंडारी समाज हा प्रामाणिक आणि निष्ठा ठेवणारा, अभिमान वाटेल, एखाद्याला दिलेला शब्द न मोडणारा असा हा भंडारी समाज आहे. जिल्ह्यात हा समाज घट्ट आहे. त्यांच्यातील गुण आणि प्रेरणा घेण्यासारखी आहे.

या समाजातील मायनाक भंडारी यांचे कार्य मोठे आहे. या जिल्ह्यात भंडारी समाज भवन व वसतिगृह उभारण्यासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील. तुम्ही फक्त जागा निश्चित करून द्या, वर्षभरात ही सुसज्ज वास्तू उभी करून देण्याची जबाबदारी माझी आहे. फक्त तुम्ही उशिर करू नका, असे सांगून याबाबत अतुल बंगे आणि कुडाळ मधील मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे ना. राणे यांनी सांगितले. श्री. बांदिवडेकर म्हणाले, तुम्ही सर्व विद्यार्थी सिंधुदुर्गचेच नव्हे तर देशाचे भवितव्य आहात. इच्छाशक्ती ठेवून यशस्वी जीवनाकडे वाटचाल करा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि समाजाला साजेसे काम करा. एआय तंत्र प्रणाली आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी करून जिल्ह्यात एआय टर्मिनल होण्याची मागणी केली. भंडारी समाजाचे भागोशीशेठ किर, मायनाक भंडारी यांच्या विषयी त्यानी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page