सावंतवाडी प्रतिनिधी
राज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे._
_दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम मानला जातो. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व कॉम्प्युटर या मुख्य शाखा आहेत. विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे शाखा निवडून अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे. या कार्यक्रमात पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेशप्रक्रियेचा तपशील, आवश्यक कागदपत्रे, शासकीय शिष्यवृत्ती व उपलब्ध नोकरी व व्यवसायाच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
हे मार्गदर्शन सत्र पूर्णपणे मोफत असून दहावी उत्तीर्ण जास्तीत विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी शहर ते कॉलेजपर्यंत वाहतूक सुविधा संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीसाठी ९४०५०९९९६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.