सावंतवाडी प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आंबोली मंडल युवा मोर्चाची नूतन कार्यकारिणी आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आंबोली मंडल युवा मोर्चा अध्यक्ष कु. निलेश विष्णू पास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडीची घोषणा करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
या नूतन कार्यकारिणीमध्ये अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. यामध्ये सरचिटणीस पदी स्वप्निल संतोष राऊळ आणि विघ्नेश दत्ताराम मालवणकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदी विकास लक्ष्मण गावडे, काशीराम मालू राऊत, सुहास कृष्णा राऊळ आणि प्रशांत शिवराम राणे यांची वर्णी लागली आहे. तर सचिव पदी न्हानू (बबलू) सिताराम राऊळ, भूषण भरत बांदिवडेकर आणि अविनाश सुनील घाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी नूतन कार्यकारिणीला मोलाचे मार्गदर्शन केले. “भाजपा संघटना वाढीसाठी तुम्ही केव्हाही हाक द्या, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे पक्षाच्या माध्यमातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून आपण निश्चितपणे मंजूर करून घेऊ,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना आगामी संघटनात्मक कामासाठी शुभेच्छा दिल्या.
मंडल अध्यक्ष निलेश पास्ते यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. आगामी काळात आंबोली मंडल कार्यक्षेत्रात युवकांचे जाळे अधिक मजबूत करून, सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवी टीम कटिबद्ध असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गौरव जाधव, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, माडखोलचे माजी सरपंच बाळू शिरसाठ, आंबोली मंडल सरचिटणीस संजय शिरसाट, भाऊ कोळमेकर यांसह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
