वालावल येथे दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई यांचा सत्कार..
कुडाळ.
अष्टपैलू दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई हे केवळ एक नाव नाही, तर दशावताराच्या रंगमंचावर अविरत उजळत राहिलेला एक जिवंत दीप आहे. अभिनयातील सहजता, वाक्चातुर्याची धार, पदन्यासातील लयबद्ध सौंदर्य आणि संगीताची आत्मस्पर्शी अनुभूती या साऱ्या गुणांनी नटलेले आपले व्यक्तिमत्त्व पाहिले की लोककला केवळ सादरीकरण न राहता साधना कशी होते याची प्रचीती येते. पुराणांचे गाढे अभ्यासक म्हणून कथानकातील प्रत्येक प्रसंग त्यांनी जिवंत केले आहेत. आणि रसिकांच्या मनात तो कायमचा ठसा उमटवला आहे, असे गौरोवोद्गार भाजपचे जिल्हा नेते आणि उद्योजक रुपेश पावसकर यांनी काढले. वालावल येथे झालेल्या कार्यक्रमात रुपेश पावसकर यांच्या हस्ते दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणई यांच्या सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
वालावल साईभक्त रिक्षा व्यावसायिक व विविध व्यापारी मित्र मंडळ बाजारपेठ वालावल यांच्या वतीने वालावल येथील तिर्थक्षेत्र दक्षिण काशी प्रति पंढरपुर श्री लक्ष्मीनारायण वालावल बस स्थानाकात सद्गुरु श्री साईंनाथ महाराज प्रतिमा पुजन आणि सत्यनारायण महापुजा कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी दशावतार क्षेत्रातील अष्टपैलू कलावंत दत्तप्रसाद शेणई यांचा उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दत्तप्रसाद शेणई यांचा वाढदिवस १८ डिसेंबर रोजी झाला. त्याचे औचित्य साधून वालावल साईभक्त रिक्षा व्यावसायिक व विविध व्यापारी मित्र मंडळ बाजारपेठ वालावल यांची वतीने कार्यक्रम दरम्यान त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. पावसकर म्हणाले, दशावतार कलाकार संघटन व कलाकारांच्या हितासाठी श्री. शेणई ज्या निःस्वार्थ भावनेने झटतात, ती सेवा पद किंवा प्रसिद्धीसाठी नसून परंपरेवरच्या प्रेमातून जन्मलेली आहे. कलाकार हा केंद्रस्थानी असावा, त्याचे कष्ट ओळखले जावेत, त्याला सन्मानाने जगता यावे हा विचार आपल्या प्रत्येक कृतीतून दिसून येतो.
दत्तमाऊली पारंपरिक लोककला दशावतार शिक्षण-प्रशिक्षण मंडळाचे खंदे शिलेदार म्हणून श्री. शेणई केवळ मंडळ सांभाळत नाहीत, तर पुढील पिढ्यांच्या हातात लोककलेचा दिवा सुरक्षितपणे सोपवण्याचे पुण्यकार्य करत आहेत.
यावेळी सामाजिक कारकर्ते तथा मंडळाचे प्रमुख पदाधिकारी चंदू वालावलकर, महेश गोरूले, तुकाराम बंगे, विनोद आंबेकर, दिपक वालावलकर, उत्तम नांदोसकर, प्रसाद केळूसकर, दादु जबडे, अन्य कार्यकर्त सदस्य उपस्थित होते. यावेळी साईभक्त रिक्षा व्यावसायिक मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित असणारे सत्कारमूर्ती श्री.
शेणई व रुपेश पावसकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले
