सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर आ. वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात उठविला आवाज

शाळांची छप्पर दुरुस्ती, खंडित होणारा वीजपुरवठा, काजू दर, आरोग्य सुविधा यांसह अनेक प्रश्नांकडे आमदार वैभव नाईक यांनी वेधले राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष

सिंधुदुर्ग प्रतिनिधी
राज्य शासनाने प्रत्येक शाळेला गणवेश वाटप करण्याचे जाहीर केले मात्र शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले नाही.अनेक शाळांच्या इमारती तसेच छप्परे नादुरुस्त आहेत.सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने शाळांची नादुरुस्त छप्परे कोसळत आहेत.अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिला पाहिजे.याकडे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आज आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न सभागृहासमोर मांडले. तसेच त्यावर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी राज्यपाल आणि राज्य शासनाकडे केली. आ. वैभव नाईक बोलताना म्हणाले, वीजपुरवठा सुरळीत नाही म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक आंदोलने होत आहेत.अधिकारी आणि कर्मचारी पदे भरलेली नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नाही.अनेक कर्मचारी पदे रिक्त आहेत. विद्युत सामग्री उपलब्ध नाही. याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन होते. परंतु बाहेरच्या देशातील काजूची आयात केल्याने आपल्या काजूचे उत्पादन, काजूची कॉलीटी चांगली असून सुद्धा काजूला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे आयात आणि निर्यात धोरणात काही बदल केले पाहिजेत. तरच ११० ते १२० रु पर्यंत खाली आलेला काजूचा दर किमान १५० ते १६० पर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ११० रु दरात काजू उत्पादनासाठी झालेला खर्च देखील भागत नाही. याकडे लक्ष वेधले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत सुरू झाले आहे.मात्र याला तीन वर्षे होऊनही नवीन इमारतीच्या बांधकामाला अजून सुरुवात झाली नाही. अजूनही डॉक्टर आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही.नवीन मेडिकल कॉलेज उभारताना जुन्या मेडिकल कॉलेजना देखील योग्य सोयी सुविधा दिल्या पाहिजेतअशी मागणी आ.वैभव नाईक यांनी केली. जलजीवन मिशन योजनेतील अनेक कामे अपूर्ण आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही काम गेल्या दोन वर्षात पूर्ण होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्या कामांना वेग मिळाला पाहिजे. योजनेचा फायदा लोकांना झाला पाहिजे सरकारने त्याकडे लक्ष द्यावे. पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान जाहीर केले आहे परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले नाही.खावटी कर्जाची देखील माफी झाली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान केंद्रांची संख्या वाढविली पाहिजे. अशा अनेक समस्या आणि प्रश्नांकडे आमदार वैभव नाईक यांनी राज्यपाल आणि राज्यशासनाचे लक्ष वेधत ते सोडवण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page