रूपेश राऊळ;हिम्मत असेल तर सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी प्रश्न सोडून दाखवावाच
सावंतवाडी (प्रतिनिधी)
निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना आंबोली गेळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो परंतु हे केवळ मतांसाठी राजकारण सुरू आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडून दाखवावाच असे आव्हान सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी सदरच्या जमिनीवर कोणाचा तरी डोळा आहे असा जाहीरपणे म्हटले होते. माझा त्यांना आवाहन आहे की त्यांनी संबंधितांचे नाव तसेच तिलारी येथील ठेकेदारी वाटपाच्या वेळी बॉडीगार्ड घेऊन जाणाऱ्यांची नावे देखील नाव जाहीर करावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री. राऊळ पुढे म्हणाले मंत्री दीपक केसरकर निवडणुका जवळ आल्या की सर्वसामान्य जनतेला आश्वासनांची खैरात करतात आंबोलीतील मेनन कंपनी पासून सुरुवात झाले ते आजवर तसंच सुरू आहे. त्यामुळे या उद्योगांच्या नावाखाली या जमिनी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या घशात घालायच्या आहेत का असा सवाल श्री राऊळ यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच केसरकारांनी गद्दारी करून शिंदे गटात जनतेच्या भल्यासाठी प्रवेश केला असे वारंवार सांगतात परंतु त्यांनी जनतेसाठी काय केलं एक तरी प्रकल्प उभारला का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.