वसोली येथील रान भाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद….

आहारात रानभाज्यांचे असलेले महत्त्व सांगून वापर करण्याचे आवाहन: तहसीलदार श्री.वसावे

कुडाळ प्रतिनिधी
रानभाज्या या जीवनसत्वांची खाण आहेत. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गाचे देणे लाभलेल्या जिल्ह्यात रानभाज्यांची कमतरता नाही. तसेच औषधी वनस्पती देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. मात्र त्यांचे संवर्धन करणे फार गरजेचे आहे. आंबा काजू यासारख्या वेगवेगळ्या नगदी पिकांच्या लागवडीच्या वेळेस अनेक औषधी वनस्पती कडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे त्यांचे संरक्षण झाले पाहिजे.फास्ट फूडच्या जमान्यात रानभाज्याचा आहारातील वापर वाढला पाहिजे. रान भाजी महोत्सवासारख्या कार्यक्रमामधून निश्चितच या गोष्टींना चालना मिळेल. तसेच नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या रानभाज्या ग्रामीण भागातील महिलांना अर्थार्जनाचे साधनही बनू शकतील. त्यामुळे कृषी विभागाने आयोजित केलेला या रानभाजी महोत्सव निश्चितच महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन सर्वच मान्यवर वक्त्यांनी वसोली तालुका कुडाळ येथे आयोजित तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सिंधुदुर्ग, तालुका कृषी अधिकारी कुडाळ व ग्रामपंचायत वसोली यांच्या संयुक्त विद्यमाने 23 ऑगस्ट रोजी वसो ली हायस्कूल येथे रानभाजी महोत्सव अंतर्गत रान भाजी पासून बनविलेल्या पाककृतींच्या स्पर्धा व रानभाज्या व औषधी वनस्पती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीम. भाग्यश्री नाईक नवरे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री पोपटराव पाटील, तहसीलदार बिरसिंग वसावे, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री धनंजय जगताप, माजी जि प अध्यक्ष श्री संजय पडते, तालुका कृषी अधिकारी श्री रवींद्र पाटील, वसोली सरपंच श्री अजित परब, प्रगतिशील शेतकरी श्री श्रीकृष्ण परब जय भारत परब उपस्थित होते. यावेळी श्री जगताप यांनी ग्रामीण भागात असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाचे कौतुक केले तर तहसीलदार श्री वसावे यांनी उपस्थितांना आहारात रानभाज्यांचे असलेले महत्व सांगून वापर करण्याचे आवाहन केले. श्री पोपटराव पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमती नाईक नवरे यांनी अशा प्रकारच्या रानभाजी संवर्धनासारख्या उपक्रमांना आत्माचे नेहमीच पाठबळ मिळेल असे प्रतिपादन केले. श्री संजय पडते यांनी सर्व शेतकऱ्यांना जमिनी न विकता परंपरेने चालत आलेल्या शेतीमधून अधिक उत्पादन घेण्याचा सल्ला दिला.
सदर महोत्सवामध्ये सुमारे 60 विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या तर पाककृती स्पर्धेमध्ये 35 स्पर्धक भाग घेतला होता. महोत्सवाला वसोली दशक्रुशीतील शेतकरी व महिला तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्री पाटील यांनी तर सूत्रसंचालन श्री अमोल करंदीकर कृषी अधिकारी यांनी केले.
यावेळी खरीप हंगाम 2023 मध्ये तालुका पातळीवर भात पीक स्पर्धा व नाचणी पीक स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page