शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं आहे का?अर्चना घारे – परब

दोशींवर कडक कारवाई करा;सौ.अर्चना घारे परब

सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील मालवण मध्ये राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल याची जनतेला खात्री असते. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे.

गडपती शिवरायांनी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षानंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांचा चिरानचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत.

महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे. शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या सौंदर्य आणि गुणवत्ता याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे का ? या घडलेल्या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अश्या तीव्र शब्दात कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी देखील याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page