शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याची घटना दुर्दैवी निष्कळजीपणा दाखवणारे सा.बां.विभागाचे अधिकारी जबाबदार..

अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार: मंदार शिरसाट

कुडाळ प्रतिनिधी
भाजपच्या नेत्यांनी मोदींना दाखवण्यासाठी शिवछत्रपतींशी केलेली गद्दारी उघड पडली आहे. सर्जेकोट येथे उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. पण अशी घटना घडण्यासाठी निष्काळजीपणा दाखवणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग युवासेनेने दिला आहे. 

सर्जेकोट येथे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात घाईगर्दीत हा पुतळा उभारण्यात आला. नौदल दिनासाठी येणाऱ्या पंतप्रधानांना दाखवण्यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी चमकोगिरी केली आणि गडबडीने पुतळा उभारला. या पुतळ्याचे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आले. पुतळ्याच्या अंतर्भागात लोखंडाचा लवलेशही नव्हता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रकल्पाचे सगळे श्रेय घेतले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण वासियांचे जगणे देखील सरकारने मुश्किल करून टाकले होते. आज त्या सगळ्या कामाची पोलखोल झाली आहे. 

भाजपने केलेल्या सगळ्याच कामांची अशीच अवस्था आहे. घाई गडबडीने उभारलेल्या राम मंदिराला गळती लागली आहे. संसदेच्या नव्या इमारतीला गळती लागली आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फ्लाय ओव्हर कोसळून पडत आहेत. रेल्वेगाड्यांचे डबे घसरत आहेत. मालवण येथे घडलेली घटना ही या सर्वावर काडी आहे. अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट करून संबंधितांनी महाराजांशीच गद्दारी केली आहे. यासारखे दुसरे पाप नाही. जे लोक शिवछत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात ते जगात कुणालाही फसवू शकतात असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे भाजपाला हद्दपार केल्याशिवाय महाराजांना न्याय मिळणार नाही, अशी आमची भावना असल्याचे युवासेनेने म्हटले आहे. 

हा पुतळा उभारतानाच स्थानिकांनी त्याच्या निकृष्टतेची कल्पना संबंधितांना दिली होती. मात्र भाजपने नेहमीच्या पद्धतीने सगळ्यांना उडवून लावले. या पुतळ्याला जे साहित्य वापरले होते त्या त्याच्या दर्जाबाबत स्थानिक आणि बरेच प्रश्न उपस्थित केले होते. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. हाकेच्या अंतरावर सिंधुदुर्ग किल्ला चारशे वर्षे उभा असताना, त्या किल्ल्याच्या जनकाच्या पुतळा एक वर्षाच्या आत कोसळतो, हे दुर्दैवी आहे. याची जबाबदारी लवकर निश्चित व्हायला हवी.  

सर्जेकोट येथे घडलेल्या या प्रकारची संपूर्ण तपास होऊन अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अन्यथा युवासेना तीव्र आंदोलन करील असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page