मालवणात ‘सुक्या सुंगटाची कढी’ या पहिल्या संपूर्ण मालवणी कादंबरीचा वाचकार्पण सोहळा संपन्न.
शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे संपन्न झालेल्या शानदार सोहळ्यात उद्योजक व कवी रुजारीओ पिंटो आणि मान्यवरांनी कादंबरीला दिल्या सदिच्छा
मालवण (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या शिवाजी वाचन मंदिर, भरड येथे पहिली संपूर्ण मालवणी कादंबरी सुक्या सुंगटाची कढी ह्या ‘विघ्नेश पुस्तक भांडार’ प्रकाशनाच्या पुस्तकाचा वाचकार्पण सोहळा १४ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. मालवणचे लेखक सुयोग पंडित यांची ही पहिली कादंबरी असून उद्योजक व साहित्यिक रुजारीओ पिंटो आणि माजी नगरसेवक व उद्योजक नितीन वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमात सुरवातीला सूत्रसंचालक संजय शिंदे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. लेखक सुयोग पंडित यांच्या मातोश्री व कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक साहित्यिका वैशाली पंडित व नझ़िरा शेख़ यांनी मान्यवरांचे श्रीफळ व भेटवस्तू देत स्वागत केले तर सूत्रसंचालक संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यानंतर सुक्या सुंगटाची कढी ह्या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांनी स्वयंपाकाच्या हंडीमधून सुक्या सुंगटाची कढी ह्या कादंबरीच्या प्रती बाहेर काढून अनोख्या पद्धतीने या कादंबरीचे प्रकाशन तथा वाचकार्पण करण्यात आले.
यावेळी लेखक सुयोग पंडित यांनी त्यांच्या मनोगतात या कादंबरीच्या लेखना दरम्यानचे अनुभव सांगितले आणि त्यांच्या लेखनाला प्रेरक ठरलेल्या साहित्यिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर मान्यवर श्री. रुजारीओ पिंटो यांनी मालवणी कवितेद्वारे कादंबरीला शुभेच्छा दिल्या आणि कादंबरीचे थोडक्यात रसग्रहण केले. मालवणी लेखन ही जबाबदारी समजून सुयोग पंडित यांनी आपले अष्टपैलूत्व योग्य मार्गाने जपून यापुढे लेखन करावे असे त्यांनी सांगितले. आपली संस्कृती जपताना इतरांच्या संस्कृतीचा आदर करत आनंद देणे व घेणे महत्वाचे असल्याचे ही कादंबरी शिकवते असे रुजारीओ पिंटो यांनी सांगितले.
यानंतर वक्ते व मान्यवर श्री नितीन वाळके यांनी कादंबरीचे रसग्रहण करताना सांगितले की आजच्या काळामध्ये सुक्या सुंगटाची कढी ही कादंबरी लिहिणे व ती छापून आणत वाचकांसमोर ठेवणे हे लेखक सुयोग पंडित यांचे प्रचंड मोठे धाडस आहे. सामाजिक मंचांवर व एकदंर जगायच विद्वेष पसरवू पहाणार्या वृत्ती व शक्ती यांवरही नितीन वाळके यांनी परखड भाष्य केले. साहित्यामध्ये कालानुरुप होणार्या बदलांमध्ये सुक्या सुंगटाची कढी ह्या कादंबरीने एक वेगळा ठसा उमटवला आहे व ती पहिली मालवणी कादंबरी आहे म्हणून नितीन वाळके यांनी विशेष अभिनंदन करत कादंबरीला व लेखक सुयोग पंडित यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित व संजय शिंदे यांनी कादंबरीला साहित्यिक प्रमोद जोशी, साहित्यिका स्नेहल फणसळकर, कवी निलेश घाडीगांवकर, समाजसेवक हरीश उर्फ दादा वेंगुर्लेकर यांच्या विशेष शुभेच्छांचे वाचन केले. मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत, प्रतिभा तोरसकर, अर्चना कोदे, ज्योती तोरसकर या उपस्थितांनी देखिल कादंबरीला विशेष मनोगता द्वारे शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला मान्यवर रुजारीओ पिंटो, नितीन वाळके, साहित्यिक वैशाली पंडित तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संचालक श्री विजय रावराणे व सौ. फिलोमीना पंडित, श्री. श्रीकांत सावंत, ज्येष्ठ पुरोहीत श्री. बाळू काजरेकर, प्रा. सुमेधा नाईक, प्रा. ज्योती तोरसकर, प्रतिभा तोरसकर, मुख्याध्यापिका व साहित्यिक सौ. अर्चना कोदे व त्यांच्या कन्या सौ. विराणी, शिक्षिका रोहिणी दिघे, दादा वेंगुर्लेकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू नंदू देसाई, ॲड. अमिया बांदेकर,
लेखक सुयोग पंडित आणि शिवाजी वाचन मंदिरच्या कार्यवाह वैदेही जुवाटकर व ग्रंथपाल मानसी दुदवडकर व मालवण मधील साहित्यप्रेमी उपस्थित होते.
सहिष्णू पंडित यांनी आयोजकां तर्फे उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले आणि शिवाजी वाचन मंदिर यांना विशेष धन्यवाद दिले.
शिक्षक व कीर्तनकार महेश धामापूरकर यांनी ‘अक्षर प्रार्थना पसायदान’ सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.