भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात….

स्वाती पाध्ये यांचा ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव….

सावंतवाडी प्रतिनिधी
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट डे दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हा समाजाला फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करुन देणे हा आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या स्वाती पाध्ये, जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, भोसले नॉलेज सिटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे उपस्थित होते._
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.जगताप यांनी फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या व त्याचे समाजातील महत्वपूर्ण स्थान याचा उल्लेख केला. फार्मासिस्ट हे आरोग्य सेवेतील महत्त्वाचा दुवा आहेत व आरोग्य व्यवस्थापनात औषधांचे उत्पादन, परीक्षण आणि वितरण ही महत्वपूर्ण जबाबदारी ते पार पाडतात असे ते म्हणाले. सत्यजित साठे यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्व्हेचा दाखला देत देशात अजूनही ९४% लोक हे स्थानिक फार्मासिस्टवर विश्वास ठेवतात व योग्य औषधोपाचारांसाठी त्यांचा सल्ला घेतात असे नमूद केले. भोसले फार्मसी कॉलेज गेली दहा वर्षे यशस्वीपणे फार्मासिस्ट दिन साजरा करत असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील फार्मासिस्ट बांधवांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते असेही ते म्हणाले._
_’फार्मासिस्ट ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी कणकवली येथील पाध्ये मेडिकल स्टोअर्सच्या स्वाती पाध्ये यांच्या नावाची घोषणा आनंद रासम यांनी केली. गेली नऊ वर्षे असोसिएशनच्या माध्यमातून उल्लेखनीय व्यक्तींची नावे सन्मानासाठी निवडली गेली. यंदा प्रथमच हा पुरस्कार एका महिला फार्मासिस्टला देण्यात येत असून संघटनेसाठी ही बाब अतिशय अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले._
_अच्युत सावंतभोसले यांनी विद्यार्थी व समाजात काम करणारे फार्मासिस्ट यांच्यातील कनेक्ट वाढावा यासाठी संस्था हा कार्यक्रम आयोजित करत असल्याचे म्हटले. स्वाती पाध्ये यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गेली अडतीस वर्षें आपण प्रामाणिकपणे व सचोटीने हा व्यवसाय केल्याचे सांगितले. महिला फार्मासिस्ट या नात्याने रुग्णांना सेवा देतानाच एक यशस्वी व्यावसायिक बनता आले याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. आपण सचोटीने केलेल्या कामाची पोचपावती म्हणजेच आजना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक मिळालेला पुरस्कार असे त्या म्हणाल्या._
_तत्पूर्वी सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी लेबल मेकिंग, फार्मा कार्टून मेकिंग, फार्मा प्रॉडक्ट मार्केटिंग व रील मेकिंग अशा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले._
_कार्यक्रमाला बाळासाहेब डोर्ले, राजेंद्र म्हापसेकर, मकरंद कशाळीकर, ग्रेगरी डांटस, श्रीकृष्ण सप्ते, विजय घाडी, मकरंद घळसासी, संजय घाडीगावकर, सचिन मुळीक, अमर गावडे, सचिन बागवे, ज्ञानदीप राऊळ, प्रेमानंद देसाई, संतोष राणे आदी फार्मासिस्ट उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरी भिवशेठ व आभार प्रदर्शन नेहा मडगावकर यांनी केले._

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page