रूरल चेंबर ऑफ काॅमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री घुईखेडेकर यांचे प्रतिपादन..
सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मराठी नव उद्योजकांना योग्य मार्गदर्शन व योग्य दिशा न मिळाल्याने मराठी नव उद्योजक तयार होत नाहीत आणि काही अपवाद सोडल्यास जे धडपड करतात त्यानां म्हणावं तसं यश मिळत नाही. आपल्या देशात पासष्ट टक्यांपेक्षाही जास्त युवा वर्ग बेकार असून ग्रामीण भागात यांची संख्या जास्त आहे. त्यातल्या त्यात खाजगी कंपन्या व काही खाजगी उद्योग हे शहरात असल्याने अल्प पगारावर काही खाजगी नोकऱ्या मिळतात माञ ती परिस्थिती ग्रामीण भागात नाही.
शासन आपल्या परीने बेरोजगानां रोजगार देण्यासाठी करत असलेले प्रयत्न हे तोकडे असून त्याला मर्यादा आहेत. नोकरीच्या संधी कमी झाल्याने महाराष्ट्रातील नव उद्योजकांनी स्वतः छोटेमोठे उद्योग सुरू करावेत आणि ते व्यवस्थीत चालावे त्यानी निर्माण केलेल्या उत्पादनाना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी यासाठी रूरल चेंबर ऑफ कॉमर्सने ही चळवळ सुरू केलेली असून यासाठी रूरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री घुईखेडेकर, अमरावती यांनी जनसंपर्क मोहीम सुरू केलेली असून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राचा त्यांनी आढावा घेतला.
आता सुरू असलेले उद्योग, निरनिराळ्या कारणामुळे बंद पडलेले उद्योग, उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठी नव उद्योजकांची माहिती श्री घुईखेडेकर यांनी कुडाळ एम्. आय्. डि. सी. चे कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर व असोसिएशनचे पदाधिकारी श्री संतोष राणे यांचेकडून घेतली. रूरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून हजिल्ह्यातील शेतकरी व त्यांच्या शेतमालाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही चळवळ व्यापक करण्यासाठी गावं, तालुका व जिल्हा स्तरावर रूरल चेंबर ऑफ कॉमर्सच्या समित्या स्थापन करून त्या अनुषंगाने मराठी नव उद्योजकांची नजीकच्या काळात एक कार्यशाळा आयोजित करुन ही मराठी नव उद्योजकांना उद्योगधंद्यासाठी जास्त जास्त आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
२०५० पर्यंत ग्रामीण क्षेत्र हे शहरीकरणात रूपांतरीत होणार असल्याने भविष्यात मराठी तरुण उद्योजकांनी त्यानुसार पुढील आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे असेही आवाहन श्री घुईखेडेकर यांनी केले.