चिंदरकरांनी अर्धवट वक्तव्य करून महायुतीत संभ्रम निर्माण करू नये, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणेंनी मांडली भुमिका..
मालवण प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या व्हिजनचा होता. महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांनी एकसंघ केलेल्या कामाचा आहे. काही ठिकाणी मताधिक्य कमी झाले. त्याचा आढावा पक्षाच्या माध्यमातून घेतला जात आहे. असे असताना पराभूत उमेदवार वैभव नाईक यांना निवडणुक काळात कोणीतरी रसद पुरवली. त्यांची ताकद वाढवण्यात आली. निलेश राणे यांचा पॉलिटिकल एनकाउंटर करण्याचा प्रयत्न झाला. असे वक्तव्य भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले. जर चिंदरकर यांना यां सगळ्या गोष्टी माहित असतील तर त्यांनी त्या व्यक्तींची नावे जाहीर करावीत. अर्धवट वक्तव्य करून जनतेत आणि महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. विजयानंतर जल्लोष होत असताना नेते मंडळी यांना कार्यकर्ते विजयाचे श्रेय देत असतात. राणे कुटुंब आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांना विजयाचे श्रेय आहेच. सोबतच महायुतीचे नेते मंडळी, कार्यकर्ते हे सर्व विजयाचे शिल्पकार आहेत. किंगमेकर आहेत. गेम चेंजर आहेत. अश्या अनेक उपाध्या दिल्या जाऊ शकतात. तसेच त्याबाबत कुठे मीडियात काय येते हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.